
अहिल्यानगर : चोरीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. भाऊसाहेब गोविंद काळे, असे या वर्ग-३ अधिकाऱ्याचे नाव असून, तो अहिल्यानगर जिल्ह्यातील एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तोफखाना पोलीस स्टेशनमधील गु.र.नं. ५६९/२०२४ (भा.दं.वि.क. ३९४, ३४) या चोरीच्या गुन्ह्यात तक्रारदाराच्या भावाने चोरीचे सोने विकत घेतले या गुन्ह्यात त्याला आरोपी न करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गोविंद काळे याने तक्रारदाराकडे ७०,००० रुपये लाचेची मागणी केली. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे तक्रार दिली होती.
९ मे २०२४ रोजी एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान, आरोपी लोकसेवक भाऊसाहेब गोविंद काळे याने पंचांसमक्ष तक्रारदाराच्या भावाला गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी, तसेच गुन्ह्यातील तपास अधिकारी यांच्या नावाच्या प्रभावाचा बेकायदेशीर वापर करून फिर्यादीकडे सोन्याच्या रिकव्हरीऐवजी ७०,००० रुपये लाचेची मागणी केली आणि ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
या घटनेनंतर, आरोपी भाऊसाहेब गोविंद काळे याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन:

भ्रष्टाचारासंबंधी कोणतीही माहिती असल्यास किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.
संपर्क पत्ता: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टी.व्ही. सेंटरसमोर, सावेडी, अहिल्यानगर



