
पुणे/पिंपरी-चिंचवड: महायुती सरकार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) भ्रष्ट, भोंगळ आणि बिल्डरधार्जिण्या कारभाराविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज पुण्यात आयोजित केलेला ‘विराट धडक मोर्चा’ पूर्णपणे यशस्वी ठरला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात मांडलेल्या झोपडीवासीयांच्या सर्व प्रमुख मागण्या एसआरए प्रशासनाने तातडीने मान्य केल्या आहेत, ज्यामुळे हजारो झोपडीवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रशासनाकडून तत्काळ दखल:
एसआरएच्या माध्यमातून सुरू असलेल्या गैरकारभाराचा निषेध करण्यासाठी आणि झोपडीवासीयांसह सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हा ‘विराट धडक मोर्चा’ काढण्यात आला होता. मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच पिंपरी चिंचवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. महायुती सरकार आणि एसआरएच्या धोरणांवर तीव्र आक्षेप घेत हा मोर्चा काढण्यात आला आणि त्याचा समारोप एसआरए कार्यालय, पुणे येथे झाला.
एसआरएच्या कामातील अनियमितता आणि बिल्डरधार्जिण्या भूमिकेमुळे सामान्य नागरिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रभावी उपस्थितीमुळे या आंदोलनाकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात लक्ष वेधले गेले होते.

प्रशासनाने मान्य केलेल्या प्रमुख मागण्या:
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एसआरए कार्यालयासमोर नागरिकांच्या हक्काच्या घरांसाठी जोरदारपणे भूमिका मांडली. त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या प्रशासनाने तातडीने मान्य केल्या, त्या खालीलप्रमाणे:
१) रखडलेल्या प्रकल्पांना त्वरित नियम लागू: पिंपरी-चिंचवडमधील जे एसआरए प्रकल्प गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले आहेत, त्यांना एसआरएचे (SRA) नियम त्वरित लागू करण्यात यावेत.
२) मासिक घरभाड्याची वाढीव रक्कम: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात एसआरए प्रकल्पग्रस्तांना दरमहा पंधरा हजार रुपये घरभाडे (रेनट) देण्यात यावे.
३) अपात्र ठरवण्याचे काम थांबवावे: चुकीच्या धोरणांमुळे नागरिकांना अपात्र ठरवण्याचे काम तातडीने थांबवण्यात यावे आणि पात्र झोपडीवासीयांना त्यांचे हक्क त्वरित देण्यात यावेत.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या सर्व मागण्या मांडल्यानंतर एसआरए प्रशासनाने त्या मान्य केल्यामुळे, वंचित बहुजन आघाडीचा एसआरए विरोधातील विराट धडक मोर्चा यशस्वी झाला. एसआरए प्रशासनाकडून सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील एसआरए बाधित लोकांनी ॲड. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे विशेष आभार मानले आहेत.



