
अहिल्यानगर: (अहमदनगर) अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक शाळा माहिती अधिकार अधिनियम, २००५ च्या नियमांचे पालन करत नसल्याचे समोर आले आहे. या कायद्यानुसार शाळांनी १७ मुद्द्यांची माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक असताना, अनेक शाळा ही माहिती पोर्टलवर किंवा त्यांच्या स्तरावर प्रसारित करत नाहीत. याबद्दल शिक्षण विभागाला तक्रारी प्राप्त झाल्याने, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील यांनी कठोर भूमिका घेत सर्व शाळांना या नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
कायद्याचे उल्लंघन
टाकळी काझी (ता. नगर) येथील दीपक पाचपुते यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही केली. पाचपुते यांच्या तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे, शाळांकडून निधीचा वापर, शाळा व्यवस्थापन समितीची रचना, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, अनुदान आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती सार्वजनिक केली जात नाही.
शिक्षणाधिकारी पाटील यांनी या संदर्भात एक आदेश काढला असून, माहिती प्रसारित न करणे हे माहिती अधिकार अधिनियम २००५ चे तसेच काही न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, ज्या शाळा या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई केली जाईल.
माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक
माहिती अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम ४(ख) नुसार प्रत्येक शाळेला काही विशिष्ट माहिती नियमितपणे जाहीर करणे आवश्यक आहे. यात शाळा व्यवस्थापन समितीचे अहवाल, निधीचा वापर आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुकांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. ही माहिती शाळेच्या पोर्टलवर आणि सूचना फलकावर नियमितपणे प्रसिद्ध करणे कायद्याने बंधनकारक आहे.
शिक्षण विभागाच्या या कठोर भूमिकेमुळे आता सर्व शाळांना कायद्याचे पालन करावे लागणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि नागरिकांना शाळांच्या कामकाजाबद्दल पारदर्शकता मिळेल.



