
पुणे: हडपसर आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत वाहन चोराला गुन्हे शाखा युनिट ३ च्या पोलिसांनी अटक केली आहे. आकाश सुरेश वाघरी (वय २३, रा. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, पुणे) असे या चोराचे नाव असून, त्याच्याकडून ४०,००० रुपये किमतीच्या दोन होंडा शाईन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
असा लागला छडा
२० मे २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार अमित बोडरे आणि चेतन शिरोळकर यांना गुप्त माहिती मिळाली की, आकाश वाघरी हा चोरीच्या विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलसह सुर्यमुखी गणेश मंदिराजवळ, पुनावाला चौक, मांजरी-हडपसर रोड येथे थांबलेला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आकाश वाघरीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने १५ ते २० दिवसांपूर्वी मगरपट्टा, हडपसर येथून एक होंडा शाईन मोटारसायकल (क्र. एम.एच.१२ पी.एफ. ६३८७) चोरल्याचे कबूल केले. ही गाडी २७ एप्रिल २०२५ रोजी टेस्टी पंजाब हॉटेल, मगरपट्टा येथून चोरीला गेली होती आणि याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा (रजि. नंबर ४३१/२०२५) दाखल होता.
दुसरी दुचाकीही हस्तगत
आकाशने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने आणि त्याच्या मित्राने अंदाजे १५ ते २० दिवसांपूर्वी लोणी काळभोर टोल नाक्याजवळ, पुणे-सोलापूर हायवे येथून आणखी एक होंडा शाईन मोटारसायकल चोरली होती आणि ती तिथेच बाजूला लावली आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता, होंडा शाईन मोटारसायकल क्रमांक एम.एच.१२ एन.आर.०९९४ मिळून आली. तिचे रजिस्ट्रेशन तपासले असता, ही गाडी २७ एप्रिल २०२५ रोजी कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर येथून चोरीला गेली होती आणि याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा (रजि. नंबर २२३/२०२५) नोंद होता.
अशा प्रकारे, सराईत वाहनचोर आकाश सुरेश वाघरी याच्याकडून एकूण ४०,००० रुपये किमतीच्या दोन होंडा शाईन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.



