आपला जिल्हाताज्या घडामोडीशहर

धुळे शहर व ग्रामीण भागातील विजेची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

धुळे शहर व ग्रामीण, शेवगाव तालुक्यातील ऊर्जा विषयक प्रश्नांचा घेतला आढावा

मुंबई : धुळे शहर व ग्रामीण तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील विजेच्या प्रलंबित कामांना गती देऊन ती तातडीने पूर्ण करावीत. तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी निरंतर वीज योजनेतून जास्तीत जास्त रोहित्र उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले आहेत.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी निर्मल भवन येथे बैठकीत धुळे शहर व धुळे ग्रामीणचा आणी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका येथील ऊर्जा विषयक प्रश्नांच्या अनुषंगाने आढावा घेतला. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, आमदार राघवेंद्र पाटील, आमदार मोनिका राजळे, संचालक अरविंद बाधिकर, संचलन व सुव्यवस्था महापारेषण संचालक सतिश चव्हाण, प्रकल्प महावितरण संचालक प्रसाद रेशमे, मुख्य अभियंता महापारेषण संजीव घोळे, अधीक्षक अभियंता प्रकाश लिमकर, भुसावळ मंडळ महापारेषणचे अधीक्षक अभियंता  मनीष खत्री, अधीक्षक अभियंता उदय येवले, महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेश पवार उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी धुळे जिल्ह्यातील वीजपुरवठा सुधारण्याच्या उपाययोजनांवर तातडीने काम करावे. महापारेषणने धुळे ग्रामीण येथील बोरिस व शिरूर येथे 132 के.व्ही. चे दोन उपकेंद्र तात्काळ प्रस्तावित करावीत. तसेच धुळे शहरातील एमआयडीसी जवळील अतिरिक्त जागा उपलब्ध होऊन एमआयडीसीचे वाढीव क्षेत्र निर्माण होत असून उद्योगांची उभारणी होत आहे या दृष्टीने एमआयडीसी लगत 132 के.व्हीचे उपकेंद्राचा प्रस्तावही तात्काळ मार्गी लावावा, अशा सूचना राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी दिल्या आहेत.

धुळे शहरात काही ठिकाणी विजेच्या तारा उंच इमारतीला चिकटलेल्या असल्याने धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ए.बी. केबलसाठी निधीची तरतूद करण्यात यावी. तसेच धुळे शहर व ग्रामीण भागातील व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील पावसाळ्यापूर्वी विद्युत देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात यावी. वीज गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी वीज चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी दिले. कुसुम योजनेची प्रलंबित कामे व मागील त्याला सौर कृषी पंप योजनेची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker