
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी येथे आरोग्य विभागाच्या अनास्थेचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वेळेवर ॲम्ब्युलन्स न मिळाल्याने एका आदिवासी गर्भवती महिलेला दुचाकीवरून प्रसूतीसाठी घेऊन जात असताना रस्त्यातच तिची प्रसूती झाली. धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेनंतर तब्बल अडीच तास नवजात अर्भक आणि आई रस्त्यावरच होते, तरीही अवघ्या एक किलोमीटर अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही कोणताही आरोग्य कर्मचारी मदतीला धावला नाही.
या गंभीर घटनेमुळे आरोग्य सेवेतील त्रुटी आणि प्रशासकीय उदासीनता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी शासनाकडे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
खासदार सुळे यांनी या घटनेतील पीडित महिलेला नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. तसेच, या परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमितपणे ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची कायमस्वरूपी सोय सरकारने करावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील, असेही त्यांनी म्हटले आहे. आरोग्य विभागाच्या या गलथान कारभारावर सर्व स्तरातून टीका होत आहे.



