
पुणे: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जुन्या वाहनांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आता त्यांच्याकडील प्रत्येक व्यवहाराची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक करण्यात आले आहे. अपर जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार, ही माहिती न दिल्यास संबंधित व्यावसायिकांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.
ग्रामीण भागात वाढत्या नागरी वसाहतींमुळे जुन्या दुचाकी आणि इतर वाहनांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या व्यवहारांचा योग्य तपशील ठेवला जात नसल्याने चोरीच्या वाहनांची विक्री होण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे गुन्हे उघडकीस आणण्यात अडचणी येत असल्याने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार, जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना प्रत्येक ७ दिवसांनी खालील माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात सादर करावी लागणार आहे:
* वाहनांची माहिती: वाहन क्रमांक, इंजिन क्रमांक, चेसीस क्रमांक, आरसी (नोंदणी प्रमाणपत्र) आणि टीसी (हस्तांतरण प्रमाणपत्र) पुस्तकाची माहिती.
* मूळ मालकाची माहिती: मूळ मालकाचे नाव, मूळ गावचा आणि सध्याच्या वास्तव्याचा संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक आणि ओळखपत्र.
* खरेदीदाराची माहिती: खरेदीदाराचे नाव, मूळ गावचा आणि सध्याच्या वास्तव्याचा संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक आणि ओळखपत्र.
या नियमांचे पालन करून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास आणि चोरीच्या वाहनांना आळा घालण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.



