आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘एसटी’ महामंडळात मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत अधिकाऱ्यांची बदली करा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, अनेक अधिकारी एकाच मुख्यालयात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसल्यामुळे त्यांचे काही ठराविक कर्मचाऱ्यांशी हितसंबंध निर्माण होतात. त्यातून ते इतर  कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात. याचा विपरीत परिणाम एस टी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर  होत आहे. त्यामुळे भविष्यात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी.

यावेळी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यासंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले आहे.

संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) बसस्थानक परिसरातील समस्यांसंदर्भात आमदार सत्यजित तांबे व अमोल खताळ यांच्या शिष्टमंडळासमवेत परिवहन मंत्री सरनाईक यांनी चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी विस्तारित जागा देणे, नाशिक- पुणे महामार्गावरुन जाणाऱ्या बसेसना संगमनेर बसस्थानकामध्ये थांबा देणे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker