
पुणे:– सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय आणि हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. ‘राष्ट्रवादी जनसुनावणी’ असे नाव असलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ १३ सप्टेंबर रोजी हडपसर येथून होणार आहे. हा उपक्रम समाजातील सर्व घटकांच्या हितासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.

या जनसुनावणीच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या स्थानिक समस्या आणि अडचणी थेट पक्षाच्या नेत्यांपर्यंत पोहोचवता येणार आहेत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक विशेष हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. नागरिक ७८८८५६६९०४ या क्रमांकावर कॉल करून आपल्या परिसरातील समस्यांची नोंद करू शकतात. प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची योग्य दखल घेतली जाईल आणि त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
पक्षाच्या म्हणण्यानुसार, जनसुनावणीच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे नागरिकांच्या समस्यांवर वेळेत तोडगा काढणे शक्य होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हडपसर येथील नागरिकांना या पहिल्या जनसुनावणीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या भागातील प्रश्न मांडण्याचे आवाहन केले आहे.
जनसुनावणीच्या माध्यमातून लोकांच्या समस्या थेट शासनाकडे पोहोचवून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. या उपक्रमामुळे पक्ष आणि सामान्य जनता यांच्यातील संवाद अधिक वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



