
डोंबिवली:- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी विजय सरकट यांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा, त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये ‘संविधान अमृत महोत्सव‘ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत, २३ जुलै २०२५ पासून ‘चला संविधान समजून घेऊ’ आणि ‘घर घर संविधान’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सरकटे यांनी एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून ते स्वतः प्रत्येक शाळेतील कार्यक्रमांवर लक्ष ठेवून आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी सोप्या भाषेत पोहोचाव्यात आणि त्यांच्यामध्ये संवैधानिक मूल्यांची रुजवणूक व्हावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. या ऐतिहासिक उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसने केले अभिनंदन
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ) या संघटनेने या उपक्रमाचे स्वागत केले आहे. संघटनेचे राज्य महासचिव ॲड. डॉ. केवल ऊके यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव वैभव गिते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी या कार्यक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांचेही आभार मानले.
यावेळी, पत्रकारांशी बोलताना वैभव गिते यांनी इतर जिल्ह्यांमधील शिक्षणाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांनीही असाच उपक्रम राबवावा, असे आवाहन केले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शासनाने २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिन साजरा केला, परंतु ‘संविधान अमृत महोत्सव’ त्याव्यतिरिक्त कुठेही साजरा करण्यात आला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
संविधान दिनाच्या इतिहासाची आठवण
गिते यांनी यावेळी संविधान दिन साजरा करण्याच्या इतिहासाचीही आठवण करून दिली. सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी नागपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना सर्वप्रथम संविधान दिन साजरा केला होता. त्यानंतर, समाज कल्याण विभागाचे संचालक म्हणून काम करताना त्यांच्याच प्रयत्नांमुळे २४ नोव्हेंबर २००८ रोजी शासन निर्णय काढून संविधान दिन साजरा करणे बंधनकारक झाले, असे त्यांनी सांगितले.
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस आणि ई. झेड. खोब्रागडे यांच्या ‘संविधान प्रतिष्ठान नागपूर’ या संस्थेने संविधान अमृत महोत्सव साजरा करण्याची मागणी सातत्याने केली होती. त्यानंतरच शासनाने याबाबत निर्णय घेतला, पण २६ नोव्हेंबर २०२४ व्यतिरिक्त हा महोत्सव कुठेही साजरा झाला नाही, असे गिते यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, विजय सरकटे यांनी सुरू केलेला ‘घर घर संविधान’ हा उपक्रम एक आदर्श उदाहरण म्हणून समोर आला आहे.



