ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशहरसामाजिक

मानवी तस्करीविरोधात ‘संवेदनशीलता ते संकल्प’ कृतिशाळा: जनजागृती आणि एकत्रित प्रयत्नांवर भर

मुंबई: जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने ‘संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा’ या विशेष कृतिशाळेचे आयोजन सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे करण्यात आले. मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी समाजात जनजागृती निर्माण करणे आणि ही एक लोकचळवळ बनवणे यावर या कार्यशाळेत भर देण्यात आला.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पशुसंवर्धन आणि पर्यावरण बदल मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर आणि महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाप्रसंगी बोलताना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानवी तस्करीविरोधी जनजागृती आणि लोकचळवळ तयार करण्याची नितांत गरज अधोरेखित केली. त्या म्हणाल्या, “महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, परंतु मानवी तस्करीसारख्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन कृतिशील कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे.”

या कृतिशाळेत मानवी तस्करीशी संबंधित समस्या, पीडितांना मिळणारी मदत आणि कायदेशीर तरतुदींची माहिती देणाऱ्या एका पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर, विदर्भातील व्यावसायिक लैंगिक शोषणाचे अन्वेषण (तपास) करणाऱ्या अहवालाचेही अनावरण याप्रसंगी करण्यात आले, ज्यामुळे या क्षेत्रातील गंभीर समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला.

या कृतिशाळेला आमदार प्रज्ञा सातव, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार मनिषा कायंदे, आमदार हारून खान, आमदार सना मलिक, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदीनी आवाडे यांच्यासह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, ॲन्टी ह्युमन ट्रॅफिकिंग विभागाचे सर्व पोलीस अधिकारी, विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य आणि मानवी तस्करी विरोधात काम करणारे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. देशभरातून आलेले तज्ज्ञ आणि परिसंवादात सहभागी झालेले वक्ते यांनीही या कृतिशाळेला उपस्थिती लावून आपले विचार मांडले.

या कृतिशाळेच्या माध्यमातून मानवी तस्करीविरोधात व्यापक जनजागृती निर्माण करण्याचा आणि या समस्येविरोधात एकजुटीने लढा देण्याचा संकल्प करण्यात

आला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker