आपला जिल्हाताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रसामाजिक

पंढरपूर कार्तिकी यात्रेसाठी एसटी महामंडळाची जय्यत तयारी; भाविकांसाठी सोडणार ११५० जादा बसेस

मुंबई: श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने जय्यत तयारी केली आहे. भाविकांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी राज्यभरातून तब्बल ११५० जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

२८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान जादा वाहतूक

पंढरपूर येथील एसटी महामंडळाचे ‘चंद्रभागा’ हे यात्रा बसस्थानक या जादा वाहतुकीचे मुख्य केंद्र असेल. दिनांक २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त ही जादा बस वाहतूक केली जाणार आहे.

यात्रेसाठी विशेष व्यवस्था:

* बसस्थानकाचे नियोजन: चंद्रभागा बसस्थानकावर एकूण १७ फलाट असून, सुमारे १००० बसेस लावण्याची सुसज्ज पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

* कर्मचारी आणि सुरक्षा: प्रत्यक्ष यात्रेच्या दिवशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या बसस्थानकावर १२० हून अधिक एसटी कर्मचारी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच, सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या राहण्याची सोयही बसस्थानकामध्ये करण्यात आली आहे.

* देखभाल आणि दुरुस्ती: प्रवासादरम्यान वाहने नादुरुस्त झाल्यास त्वरित दुरुस्तीसाठी वाहन दुरुस्ती व देखभालीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पंढरपूर शहराबाहेर मार्गस्थ बिघाड झालेल्या वाहनांना त्वरित मदत देण्यासाठी पथके तैनात करण्यात येणार आहेत.

* हिरकणी कक्ष: गरोदर माता आणि स्तनदा मातांसाठी बसस्थानकावर ‘हिरकणी कक्ष’ ची विशेष सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

गाव ते पंढरपूर थेट सेवा आणि गट आरक्षण सवलत

एसटी महामंडळाने यंदाही भाविकांसाठी खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यात्रा कालावधीमध्ये ४० किंवा त्याहून अधिक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास, त्यांच्या गावातून थेट पंढरपूरपर्यंत जाण्यासाठी एसटी महामंडळ बस उपलब्ध करून देणार आहे.

गट आरक्षणातील सवलती:

या गट आरक्षणामध्ये ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी ५० टक्के आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास करण्याची सवलत लागू राहणार आहे. त्यामुळे प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी भाविक प्रवाशांनी येता-जाता आपल्या गावातून गट आरक्षण करावे, असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

मागील वर्षी ६ कोटी रुपयांचे उत्पन्न

मागील वर्षीच्या कार्तिकी यात्रेमध्ये एसटी महामंडळाने १०५५ जादा बसेस च्या माध्यमातून सुमारे ३ लाख ७२ हजार भाविक प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली होती. त्यातून महामंडळाला जवळपास ६ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते.

यंदाच्या कार्तिकी यात्रेतही लाखो भाविक प्रवाशांची सुरक्षित ने-आण करण्यासाठी एसटीचे हजारो कर्मचारी रात्रंदिवस सेवेत तत्पर असतील, अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker