
पुणे: पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने मोठी कारवाई करत येवलेवाडी, कोंढवा परिसरातून अफू आणि डोडा चुरा या अंमली पदार्थांसह एका व्यक्तीला अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत ५ लाख रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे अधिकारी आणि अंमलदार पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधात्मक तसेच अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराच्या अनुषंगाने गस्त घालत होते. यावेळी त्यांना यश कॉम्प्लेक्स समोर, कामटे पाटील नगर, येवलेवाडी, कोंढवा येथील सार्वजनिक रोडवर एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याचे नाव अर्जुन सुखराम काला (वय ३१, रा. शिक्षक नगर, गल्ली नं. ०२, फ्लॅट नं. २०३, कामठे पाटील नगर, येवलेवाडी, पुणे) असे निष्पन्न झाले. त्याच्या ताब्यामधून पोलिसांनी एकूण ५,१३,१६०/- रुपये किमतीचे २५६ ग्रॅम ५८ मिलीग्रॅम अफू आणि २५,९२०/- रुपये किमतीचे १ किलो ७२८ ग्रॅम अफूची बोंडांची (पॉपी स्ट्रॉची) पावडर (डोडा चुरा) असा अंमली पदार्थ जप्त केला.
याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अर्जुन सुखराम काला याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. ४१८/२०२५ अन्वये एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), १७ (ब), १५ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



