
अहिल्यानगर: अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय जहाजबांधणी, बंदरे आणि जलमार्ग मंत्री श्री. सर्वानंद सोनोवाल यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी खासदार लंके यांनी आपल्या मतदारसंघातील नगर, श्रीगोंदा आणि कर्जत या भागांमध्ये मल्टीमोडल लॉजिस्टिक हब (Multimodal Logistic Hub) स्थापन करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. या हबच्या स्थापनेमुळे मतदारसंघाच्या आणि पर्यायाने राज्याच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार लंके यांनी या मल्टीमोडल लॉजिस्टिक हबच्या स्थापनेमुळे मिळणाऱ्या अनेक फायद्यांवर भर दिला. त्यांनी नमूद केले की, प्रस्तावित क्षेत्र जेएनपीटी (JNPT) पोर्टशी रेल्वेमार्गाने थेट जोडलेले आहे, ज्यामुळे मालवाहतूक अधिक सुलभ आणि वेगवान होईल. भौगोलिकदृष्ट्या, हा भाग पुणे, नगर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख औद्योगिक आणि कृषी क्षेत्रांमध्ये मध्यवर्ती आहे, ज्यामुळे लॉजिस्टिक हबसाठी हे एक आदर्श स्थान ठरते.
या हबमुळे स्थानिक शेतकरी आणि लघुउद्योजकांना मोठा फायदा होणार असल्याचे लंके यांनी सांगितले. कांदा, डाळी, डाळिंब, गहू, तांदूळ यांसारख्या कृषी उत्पादनांची निर्यात यामुळे अत्यंत सुलभ होईल. परिणामी, स्थानिक शेतमालाला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. तसेच, या हबमुळे उत्पादन, प्रक्रिया आणि निर्यातीला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार संधींची निर्मिती होईल, असेही त्यांनी अधोरेखित केले.
खासदार लंके यांनी सांगितले की, ही मागणी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी “सागरमाला” योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश देशातील बंदर-नेतृत्व विकास साधणे आणि लॉजिस्टिक्स कार्यक्षमता वाढवणे हा आहे. अहिल्यानगर दक्षिणमध्ये मल्टीमोडल लॉजिस्टिक हबच्या स्थापनेमुळे या परिसराच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्र्यांनी खासदार लंके यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेतल्याचे समजते.



