
अहिल्यानगर:- जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील रोडी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वातंत्र्य दिनानंतर अवघ्या दोनच दिवसांनी म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास विद्यमान महिला सरपंच मीनाक्षी सकट आणि त्यांच्या मुलाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. या गंभीर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर मीनाक्षी सकट यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
*Watch Full Video Here : 👇*
https://www.facebook.com/share/v/1CUV1PcmKb/
मिळालेल्या माहितीनुसार, रोडी गावच्या सरपंच मीनाक्षी सकट या आपल्या मुलासह दुचाकीवरून जात होत्या. त्याचवेळी काही अज्ञातांनी त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, या हल्ल्यातून त्या बचावल्या. या हल्ल्यामागे राजकीय वैमनस्य असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या गंभीर घटनेनंतरही पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांनी केला आहे. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, पोलिसांना तातडीने आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
या घटनेनंतर मातंग समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींना लवकरच पकडले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



