
कोल्हापूर : मौजे सांगरूळच्या ग्रामस्थांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. सांगरूळ गायरान जमिनीच्या अनुषंगाने शासनस्तरावर आढावा घेवून सामोपचाराने निश्चितपणाने तोडगा काढू, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मौजे सांगरूळ गायरान प्रश्नाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

वनहक्क अधिनिनियमातील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीने नागरी सुविधा करिता जागा मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे त्वरीत सादर करावा, अशी सूचनाही पालकमंत्री आबिटकर यांनी या बैठकीत केली. तसेच हा प्रश्न केवळ सांगरूळ गावाचा नाही तर जिल्ह्यातील इतर गावांबाबतही अशा प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी याप्रसंगी दिली. जिल्हा प्रशासनाकडून याप्रश्नी सांगरूळ ग्रामस्थांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले.
79.9 हेक्टर इतक्या गायरान जमिनीबाबत हा प्रश्न उपस्थित होत आहे. वन विभागाच्यावतीनेही या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद म्हणाले. या बैठकीसाठी मौजे सांगरूळचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



