क्राईम न्युज

Crime : मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपीला १२ तासात अटक

पुणे: हिलटॉप सोसायटी, धनकवडी येथे १६ मे २०२५ रोजी सकाळी मॉर्निंग वॉक करत असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून नेले. या घटनेची तक्रार सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०४, ३०९ (६) नुसार गुन्हा नोंदवला होता.

सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गौड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने तपास सुरू केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील आणि त्यांच्या पथकाने परिसरातील सुमारे १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासात आरोपी स्विगी कंपनीचा डिलिव्हरी बॉय असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू असताना, पोलीस अंमलदार सागर सुतकर आणि योगेश ढोले यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश चौक, आंबेगाव पठार येथे कोणाची तरी वाट पाहत आहे. त्याच्या अंगात काळ्या-पिवळ्या रंगाचा हाफ बाहीचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि वर्णनानुसार असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने त्याचे नाव अमोल किसन नाकते (वय २७ वर्षे, रा. ता. वेल्हा जि. पुणे) असल्याचे सांगितले.

पोलिसांनी अधिक तपास केला असता, अमोल नाकते याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ९०,०००/- रुपये किंमतीचे २ तोळे सोने, गुन्हा करताना वापरलेली ६०,०००/- रुपये किंमतीची दुचाकी आणि सोने गहाण ठेवून मिळालेले १,००,०००/- रुपये असा एकूण २,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मा. न्यायालयाने आरोपीला २० मे २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील करत आहेत.

ही यशस्वी कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि २, पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुरेखा चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोलीस फौजदार बापु खुटवड, पोलीस अंमलदार सागर सुतकर, योगेश ढोले, प्रदिप रेणुसे, महेश भगत, बजरंग पवार, आकाश किर्तीकर, खंडु शिंदे, अमित पदमाळे, मारोती नलवाड यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker