
नांदुरघाट, बीड: बीड जिल्ह्यातील नांदुरघाट ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक आणि दूरदृष्टीचा निर्णय घेत मराठी शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा दिली आहे. ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार, नांदुरघाट येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कुटुंबाला १ जून २०२५ पासून, जोपर्यंत त्यांची मुले या शाळेत शिकत आहेत, तोपर्यंत कसल्याही प्रकारचा ग्रामपंचायत कर (घरपट्टी तसेच विविध कर) पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतीचा हा महत्त्वपूर्ण ठराव शाळा समितीचे अध्यक्ष अमोल सखाराम जाधव आणि सचिव सचिन उद्धवराव जाधव यांच्या मागणीचा संदर्भ घेऊन, गावची जिल्हा परिषद शाळा दर्जेदार करण्याच्या अनुषंगाने घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने देखील या मागणीशी सहमती दर्शवली आहे की, जोपर्यंत नांदुर घाट जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी शिकत आहेत, तोपर्यंत त्या कुटुंबाला कोणताही ग्रामपंचायत कर लागणार नाही.

या सदरील निर्णयात नांदुर घाट येथील सरपंच सौ. सुनीता युवराज जाधव व उपसरपंच श्री. जगदीश बापूराव आंधळकर तसेच सर्व सदस्यांच्या दूरदृष्टीकोनातून जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत ग्रामपंचायत अधिकारी शिरसाट बी. वाय. यांची मोलाची साथ लाभली. हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
हा निर्णय केवळ करमाफीपुरता मर्यादित न राहता, तो मराठी शिक्षण व्यवस्था आणि समाजाला जगण्याची नवी आशा देणारा ठरू शकतो. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना बळकट करण्यासाठी आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींनी घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नांदुरघाट ग्रामपंचायतीने घेतलेला हा ‘सर्वोत्तम निर्णय’ निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे आणि भविष्यात अनेक ग्रामपंचायती अशाच प्रकारचे सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रेरित करतील अशी आशा आहे.



