
छत्रपती संभाजीनगर – उमरी, जि. नांदेड येथील तहसीलदार श्री. प्रशांत थोरात यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. उमरी येथील निरोप समारंभादरम्यान तहसीलदारांच्या अधिकृत खुर्चीत बसून गाणे सादर केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर (सोशल मीडियावर) मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

जबाबदार शासकीय अधिकाऱ्यास न शोभणारे वर्तन केल्यामुळे शासन आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन झाल्याची गंभीर दखल घेत नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालावरून श्री. थोरात यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले.
काय आहे प्रकरण?
श्री. प्रशांत थोरात यांची उमरी, जि. नांदेड येथून रेणापूर, जि. लातूर येथे बदली झाली होती. त्यांच्या निरोप समारंभात त्यांनी अधिकृत खुर्चीत बसून विविध अंगविक्षेप करत गाणे सादर केले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला. शासकीय पदावर कार्यरत असताना पदाची गरिमा आणि प्रतिष्ठा जपण्याचे भान न ठेवता, श्री. थोरात यांनी अत्यंत बेजबाबदारपणे वर्तन केल्याचे या व्हिडिओतून दिसून आले. हे वर्तन एका जबाबदार अधिकाऱ्याला अजिबात शोभणारे नाही.
शासनाचा आदेश
शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार, या गंभीर प्रकरणाची नोंद घेण्यात आली. प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने पदावर असताना त्याचे महत्त्व, वेळ, स्थळ आणि संदर्भ यांचे भान ठेवणे आवश्यक आहे. शासकीय पदावर असताना, त्या पदाच्या जबाबदाऱ्या, मर्यादा आणि प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी प्रत्येक अधिकाऱ्याची आहे. खासगी किंवा कौटुंबिक समारंभात अशा प्रकारची सादरीकरणे स्वीकारार्ह असली तरी, शासकीय व्यासपीठावर वर्तनाची मर्यादा पाळणे अपेक्षित आहे.
या घटनेमुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली असून, ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. या आदेशानुसार, श्री. प्रशांत थोरात यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, त्यांना निलंबन कालावधीत शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय खासगी व्यवसाय किंवा नोकरी करता येणार नाही, तसेच मुख्यालय सोडू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. निलंबन काळात श्री. थोरात यांना फक्त निर्वाह भत्ता (Survival Allowance) दिला जाईल.
यापुढे शासकीय अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचा संदेश
या घटनेवरून सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी बोध घ्यावा, अशी अपेक्षा महसूल व वन विभागाने व्यक्त केली आहे. शासकीय पदावर कार्यरत असताना प्रत्येकाने आपल्या वर्तनातून पदाची मर्यादा आणि प्रतिष्ठा जपावी, हा महत्त्वाचा संदेश या आदेशातून देण्यात आला आहे.



