
पुणे:- पुणे पोलिसांनी मुंढवा येथे झालेल्या एका चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्याची उकल करत, रेकॉर्डवरील गुन्हेगार तरुण झा याला अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे १.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ज्यात सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यासाठी वापरलेली अॅक्टिव्हा मोपेड यांचा समावेश आहे.

गुन्ह्याची उकल कशी झाली?
मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा रजि. नं. १३८/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना, चैन स्नॅचिंग पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सी.बी. बेरड आणि पोलीस अंमलदार शशिकांत नाळे, विनायक साळवे, मच्छिंद्र धापसे आणि तनपुरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस अंमलदार शशिकांत नाळे आणि विनायक साळवे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार तरुण झा (रा. खराडी, पुणे) याने केला असून तो मगरपट्टा, हडपसर येथे थांबला आहे.

या माहितीच्या आधारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सी.बी. बेरड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला आणि आरोपी तरुण बलराम झा (वय २६, रा. पठारे वस्ती, सुपेनगर, लेन नं ६, बालाजी हॉस्पिटल, खराडी, पुणे, मूळगाव – पटना, बिहार) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने अॅक्टिव्हा गाडी चोरून तिचा वापर करून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
जप्त केलेला मुद्देमाल:
* १५.९६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत ९०,०००/- रुपये)
* गुन्हा करतेवेळी वापरलेली अॅक्टिव्हा मोपेड गाडी (किंमत ६०,०००/- रुपये)
एकूण १,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पुढील कारवाईसाठी आरोपी तरुण बलराम झा याला मुंढवा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यशस्वी कारवाई करणारे अधिकारी:
मा. अपर पोलीस आयुक्त, प्रशासन (अति. कार्य. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे) श्री. संजय पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-१ श्री. गणेश इंगळे आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-२, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार बिडवई (दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १), वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीपान पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सी.बी. बेरड आणि पोलीस अंमलदार शशिकांत नाळे, विनायक साळवे, मच्छिंद्र धापसे, बाळासाहेब तनपुरे, राजू पुणेकर, गणेश ढगे यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.



