आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

NDRF; राज्यात मान्सूनपूर्व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ पथके सज्ज; मदत व बचाव कार्याला गती

मुंबई : भारतीय हवामान विभागाने ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा, सातारा घाटमाथा आणि पुणे घाटमाथा येथे पुढील २४ तासांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केल्याने राज्यात मान्सूनपूर्व अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संभाव्य आपत्तीच्या परिस्थितीमध्ये प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी राज्य शासनाने सज्जता दर्शविली असून, NDRF, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) पथके तात्काळ रवाना केली आहेत. आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके यांनी याबाबत माहिती दिली.

श्री. खडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसाठी दोन, तर रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक NDRF, एनडीआरएफ पथक तात्काळ रवाना करण्यात आले आहे. दरवर्षी १ जूनपासून एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) पथके तैनात केली जातात. मात्र, यावर्षी मान्सूनचे वेळेपूर्वी आगमन आणि अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता, मदत व बचाव कार्यासाठी ही पथके तातडीने कार्यान्वित करण्यात आली आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत सर्व प्रतिसाद यंत्रणांसोबत प्रभावी समन्वय साधण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र अत्याधुनिक संवाद यंत्रणा आणि आपत्तींच्या माहितीचे विश्लेषण करणाऱ्या ‘डिसीजन सपोर्ट सिस्टिम’ (DSS) ने सुसज्ज असल्याचे संचालक श्री. खडके यांनी सांगितले.

‘सचेत’ ॲपमार्फत सध्या अतिवृष्टीचे २३ अलर्ट पाठवण्यात आले असून, ९ कोटी ५० लाखाहून अधिक एसएमएस नागरिकांना आपत्तीपासून सतर्क राहण्यासाठी पाठविण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर व बारामती तालुक्यांमधील (काटेवाडी) २५ मे रोजी अवकाळी अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून दोन एनडीआरएफ पथके त्याच दिवशी रवाना करण्यात आली होती. या पथकांनी इंदापूर आणि काटेवाडी येथे पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कुरबावी गावाजवळ अडकलेल्या सहा नागरिकांनाही एनडीआरएफ पथकाने सुरक्षित स्थळी हलविले. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात दहिवडी-फलटण रस्त्यावर पूरसदृश अतिवृष्टीमुळे अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. अतिवृष्टीमुळे फलटण, बारामती भागात नीरा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आपत्कालीन परिस्थितीत मंत्रालयीन नियंत्रण कक्षासाठी ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९, ०२२-२२०२३०३९ या दूरध्वनी क्रमांकांवर किंवा ९३२१५८७१४३ आणि १०७० या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल. मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्यकेंद्रात २४x७ अधिकारी/कर्मचारी उपस्थित असल्याची माहिती संचालक श्री. खडके यांनी दिली.

अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडून राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राला भेट

राज्यात मान्सूनपूर्व पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राला भेट दिली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके यांनी आपत्कालीन परिस्थितीत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि मदतकार्याची माहिती दिली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker