
पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यात आता ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. खाजगी व्यक्ती, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांना ड्रोन कॅमेरा वापरण्यापूर्वी ७ दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यात माहिती देऊन प्रभारी पोलीस अधिकाऱ्याची रितसर परवानगी घेणे अनिवार्य आहे. अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी हे आदेश जारी केले आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय
हा निर्णय जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जिल्ह्यात अनेक महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे आणि केंद्रीय संस्था आहेत. दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याचा वापर टेहळणीसाठी केला जाण्याची शक्यता असल्याने हा प्रतिबंध घालण्यात आला आहे.
नागरिकांच्या तक्रारी आणि वाढत्या धोक्यांमुळे पाऊल
दौंड, बारामती आणि शिरूर तालुक्यात रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याशिवाय, वाळू माफिया तसेच इतर चोरीच्या घटनांमध्येही ड्रोनचा वापर टेहळणीसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आदेशात नमूद केले आहे.

‘या’ वस्तूंनाही बंदी
ड्रोनसोबतच जिल्ह्यात रिमोट-नियंत्रित मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हँग ग्लायडर, हॉट एअर बलून आणि तत्सम सर्व हवेत उडणाऱ्या वस्तूंनाही बंदी घालण्यात आली आहे.
आदेशाचा भंग केल्यास कठोर कारवाई
या आदेशाचा भंग करून पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणताही व्यक्ती ड्रोन कॅमेरा वापरताना आढळल्यास, भारतीय न्याय संहितेच्या कलम २३३ प्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी स्पष्ट केले आहे.



