
नाशिक: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (Communist Party of India – CPI) महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्या 25 व्या राज्य अधिवेशनाचा आज नाशिक शहरात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

या अधिवेशनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य बाईक रॅली आणि पदयात्रेत हजारो विद्यार्थी, युवक, महिला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी ‘जय भीम – लाल सलाम’च्या घोषणांनी नाशिक शहर दुमदुमून गेले.

अधिवेशनाची सुरुवात पक्षाचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड डॉ. भालचंद्र कानगो यांच्या हस्ते झेंडावंदनाने झाली. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या (AITUC) राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड अमरजीत कौर यांच्या हस्ते, तसेच किसान सभेच्या नेत्या कॉम्रेड पश्या पद्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत या राज्य अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

या महत्त्वपूर्ण अधिवेशनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 400 हून अधिक प्रतिनिधी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. उद्घाटन सत्राप्रसंगी विचारमंचावर किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर, पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड तुकाराम भस्मे, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड सुभाष लांडे, सहसेक्रेटरी कॉम्रेड राम बाहेती, कॉम्रेड राजू देसले यांच्यासह पक्षाच्या सचिव मंडळाचे सदस्य आणि अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते.

या अधिवेशनातून राज्यातील कामगार, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या विविध प्रश्नांवर मंथन होऊन भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे.



