
पुणे: महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी लाडकी बहीण‘ योजनेत अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत ग्राम विकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकारामुळे प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संदर्भात, ग्राम विकास, बांधकाम भवन येथील उपसचिव (कार्यालय क्र. ०२) यांनी दिनांक १८ ऑगस्ट, २०२५ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याबद्दल माहिती मागवण्यात आली आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, महिला व बाल विकास विभागाकडून ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची यादी पाठवण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार आवश्यक ती कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये एकूण ११२३ पदे समाविष्ट आहेत. या पदांवरील अधिकारी/कर्मचारी जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असल्याने, चौकशी करून कारवाईचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भ्रष्टाचाराचा संशय
‘माझी लाडकी बहीण’ ही योजना गरजू आणि पात्र महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. मात्र, अपात्र व्यक्तींना लाभ दिल्याने योजनेच्या मूळ उद्दिष्टालाच बाधा पोहोचली आहे. या प्रकरणातील गैरकारभार आणि अनियमितता गंभीर असून, जनतेच्या पैशाचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. यामुळे, भविष्यात अशा योजनांच्या अंमलबजावणीमध्ये अधिक सतर्कता आणि प्रामाणिकपणा ठेवला जाईल, अशी अपेक्षा आहे.



