
फलटण: २४ आणि २५ मे रोजी फलटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फलटण शहर आणि ग्रामीण भागात बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. फलटण शहरातून वाहणारी बाणगंगा नदी तसेच ग्रामीण भागातील अनेक ओढ्या-नाल्यांना पूर आल्याने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत शेकडो कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले.

खबरदारीचा उपाय म्हणून फलटण शहरातील शनि नगर भागातील सुमारे ४० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. याशिवाय, ग्रामीण भागातूनही अनेक कुटुंबांना सुरक्षित निवाऱ्यात हलवण्यात आले. यामध्ये मौजे खुंटे येथील हनुमान नगर परिसरातून २८ कुटुंबे, मौजे हणमंतवाडी येथील १५ कुटुंबे, मौजे गोखळी पाटी येथील १२ कुटुंबे, मौजे मुरूम येथील १० कुटुंबे, आणि मौजे सरडे येथील ११ कुटुंबांचा समावेश आहे.

दरम्यान, मौजे सस्तेवाडी येथील एक कुटुंब पाण्याने वेढलेल्या अवस्थेत होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती सुरक्षा दल (NDRF) फलटण येथे दाखल झाले होते. तथापि, दल दाखल होण्यापूर्वीच पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने ते कुटुंब सुरक्षित बाहेर पडले.
अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नागरिक अडकले होते. मौजे दुधेबावी आणि मौजे भाडळी खुर्द या दोन ओढ्यांच्या मध्ये अडकलेल्या एका खाजगी वाहनातील परगावातील अंदाजे ५० व्यक्तींची (१५ महिला व १५ लहान मुलांसह) रात्री राहण्याची आणि जेवण्याची सोय प्रशासनातर्फे करण्यात आली. त्याचबरोबर, मौजे मिर्ढे आणि मौजे जावली या दोन ओढ्यांच्या मध्ये अडकलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसमधील सुमारे ६४ प्रवाशांची रात्री राहण्याची आणि जेवण्याची सोय देखील प्रशासनाने केली.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा आणि पुढील उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे.



