
सांगली : महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ साठी सांगली, मिरज आणि सांगलीवाडी येथील २६ परीक्षा केंद्रांवर १ जून २०२५ रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी हे आदेश निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार, परीक्षा केंद्राच्या इमारतीपासून १०० मीटर परिसरामध्ये परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना फिरण्यास, एकत्रित गट करून उभे राहण्यास मनाई आहे.
याव्यतिरिक्त, परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन आणि ध्वनीक्षेपक यांचा परीक्षेशी संबंधित कोणत्याही गैरप्रकारासाठी वापर करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच, परीक्षा केंद्रात मोबाईल आणि पेजर नेण्यास मनाई आहे.
हे आदेश कायदेशीर कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना आणि धार्मिक विधींना लागू राहणार नाहीत, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.



