
सातारा, दि. १ जून: सातारा जिल्ह्याचा बहुतांश भाग डोंगरी आणि दुर्गम असल्याने, या परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाला अत्याधुनिक वाहने व साहित्य पुरवले जात आहे. पोलीस विभागाला आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यावर शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाने खरेदी केलेल्या या नवीन वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पोलीस उपअधीक्षक (गृह) अतुल सबणीस यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, सर्वसामान्य नागरिक पोलीस विभागाकडून चांगल्या कामाची अपेक्षा करतात, त्यामुळे त्यांना आवश्यक भौतिक सुविधा पुरवणे महत्त्वाचे आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाला १५ स्कॉर्पिओ, १ थार, ४ मोठ्या बसेस आणि दामिनी पथकासाठी १६ प्लेझर स्कूटी मिळाल्या आहेत. दामिनी पथकातील महिला पोलीस या स्कूटीचा वापर शाळा, महाविद्यालये, क्लासेस आणि गर्दीच्या ठिकाणी गस्त घालण्यासाठी करतील.

पोलीस विभागाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासनही श्री. देसाई यांनी दिले. सातारा पोलीस दलाचे काम सध्याही उठावदार असून, ते आणखीन प्रभावी करण्यासाठी पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
पोलीस अधीक्षक श्री. दोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पोलीस विभाग सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि सातारा पोलीस विभाग यापुढेही उत्तम पद्धतीने काम करेल.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री श्री. देसाई यांनी हिरवा झेंडा दाखवून वाहनांना मार्गस्थ केले. यामुळे सातारा पोलीस दलाची क्षमता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



